
मुंबई, १९ एप्रिल २०२६: बिग बॉस मराठी सिझन ६ ची धमाकेदार सुरुवात तीन महिन्याआधी कलर्स मराठी वाहिनीवर झाली. बिग बॉस मराठी सिझन ६ देखील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचला आणि कानाकोपर्यात फक्त याच कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली. बिग बॉस मराठीच्या या सिझनमध्ये सदस्य १०० दिवसं कॅमेरांच्या नजरकैदेत राहिले. या घराने आणि महाराष्ट्राने सदस्यांमधील भांडणं, वाद-विवाद, मैत्री, भावनांचे उतार-चढाव आणि नात्यांचे बदलते रंग पाहिले. आता अखेर हा शंभर दिवसांचा रोमांचक प्रवास आज संपन्न झाला. बिग बॉस मराठी सिझन ६ चा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला. सदस्य आणि प्रेक्षक सगळ्यांनाच उत्सुकता होती या पर्वाचा विजेता कोण असेल हे जाणून घेण्याची. ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पहात होता तो क्षण शेवटी आला. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मने जिंकत घराघरांत पोहोचलेल्या या पर्वाचा भव्य समारोप होत, तन्वी कोलते हिने आपल्या दमदार आणि सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर ‘महाविजेती’चा मान पटकावला. अंतिम क्षणापर्यंत कायम असलेल्या उत्कंठेनंतर विजेतेपदाची घोषणा होताच संपूर्ण वातावरण जल्लोषात न्हाऊन निघालं. विजेत्याला कलर्स मराठीकडून तब्बल १५ लाख धनराशी आणि ट्रॉफी देण्यात आली. विजेत्याला मिळणार आहे – पु. ना. गाडगीळ आणि सन्स तर्फे तब्बल १० लाख रुपयांचं वाउचर…रेवा डायमंडच्या सर्टिफाईड नॅचरल डायमंड ज्वेलरी खरेदीसाठी. तुनवाल ई मोटर्स ची लिथीनो प्रो ही ई बाईक देण्यात येणार आहे. रितेश देशमुख यांच्याकडून आणि राज शिवाजी चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुंदर फोटो देण्यात आला.
या घराने गेल्या १०० दिवसांत प्रत्येक भावनेचा साक्षीदार होत अनेक रंग दाखवले कधी मैत्रीची घट्ट नाती जुळताना पाहिली, तर कधी त्याच नात्यांमध्ये कटुता येताना अनुभवली. सदस्यांचे रडणं–हसणं, तक्रारी, मतभेद आणि स्पर्धेची धग यामुळे प्रत्येक दिवस नवा वाटत गेला. कॅमेरांच्या नजरकैदेत प्रत्येकाचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आला. या सगळ्या प्रवासात तन्वीने आपल्या रोखटोक बोलण्याने, जिद्दीने आणि ठाम मताने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आणि प्रेक्षकांचा विश्वास जिंकला.
Executive Vice President, Marathi Cluster‘ Jiostar, सतीश राजवाडे म्हणाले, "बिग बॉस मराठी सिझन ६’ अनोख्या थीमसह सुरू झाला आणि सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या सिझनमध्ये सदस्यांसाठी दार उघडलं आणि नशिबाचा खेळही पालटला एका मागून एक सरप्राइजेस, अनपेक्षित ट्विस्ट्स, नात्यांचे बदलते रंग आणि प्रत्येक क्षणाला नव्या आव्हानांचा सामना करत हा १०० दिवसांचा प्रवास भावनांनी, संघर्षांनी आणि जिद्दीने परिपूर्ण ठरला. या पर्वाला महाराष्ट्राचं भरभरून प्रेम लाभलं आणि प्रत्येक स्पर्धकाने आपल्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी छाप उमटवली. तन्वी कोलतेने सातत्य, प्रामाणिकपणा आणि प्रेक्षकांशी जोडलेलं नातं यांच्या जोरावर ‘महाविजेती’ हा मान पटकावला. हा शेवट नाही, तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे.”
विजेती ठरल्यानंतर भावना व्यक्त करताना तन्वी कोलते म्हणाली, “हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि शिकवणारा ठरला. या घराने मला स्वतःला ओळखायला शिकवलं, प्रत्येक परिस्थितीत ठाम राहायला शिकवलं. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आणि पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे. हा विजय मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करते. मला सगळे घरात बोलत होते विचारत होते काय काम केलंस, काय नावं तेव्हा वाईट वाटायचे पण मी ठरवलं होतं या घरातून बाहेर पडेन तेव्हा सगळ्यांच्या तोंडी माझंच नावं असेल. बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केले आहे, आले होते तन्वी कोलते म्हणून जाते आहे तन्वी कोलते हा ब्रॅण्ड बनून”.
असं म्हणता म्हणता, भावना, जिद्द आणि मनोरंजनाचा संगम असलेला हा प्रवास एका अविस्मरणीय टप्प्यावर येऊन पूर्ण झाला. ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मनात आपली वेगळी छाप उमटवत या पर्वाची दिमाखदार सांगता केली























